पालघर - विरार येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर दोन अज्ञात आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही आरोपी फरार असून, विरार पोलिसांनी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
विरार येथे राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास विरार पूर्व येथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यांच्यासोबत विरार पूर्वेकडील भास्कर वामन ठाकूर शाळेच्या मागील बाजूने जात असताना दोन अज्ञात तरुण त्याठिकाणी आले. या अज्ञात तरुणांनी तरुणीच्या मित्राला मारहाण करून त्यांना निर्जन स्थळी नेले व तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मित्राला व तरुणीला जिवे ठार मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले.
पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. पीडितेच्या वडिलांनी विरार पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.