पालघर - निसर्गात ऋतुनुसार सतत बदल होत असतात. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले वातावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्यासाठी दूर अंतरावरून स्थलांतर करत पक्षी येतात. वर्षांच्या एका विशिष्ट कालावधीत त्यांचे स्थलांतर होते. पक्षी अन्न आणि प्रजननासाठी वर्षाच्या वेगवेगळ्या हंगामात स्थलांतर करतात. पावसाळ्याची सांगता होत असताना व हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक परदेशी पक्ष्यांचे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आगमन होते.
यावर्षी परदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यातील खाडी क्षेत्र आणि किनारपट्टी भागात विविध पक्षी दिसत आहेत. पॅसिफिक गोल्डन प्लोवर, पेरिग्रीन फाल्कन, ग्रेटर सॅण्ड प्लोवर, ग्रे नेक बटींग यांसारख्या अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे पालघरच्या किनारी भागात दर्शन होत आहे. पक्षांच्या आगमनाने खाडी व समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.
पेरिग्रीन फाल्कन (बहिरी ससाणा):
हा दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर व अतिशय वेगवान हालचालीकरून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात हा पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ल्यांवरून हा पक्षी ओळखता येतो. एकेकाळी हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. परंतु 70 ते 80 च्या दशकात या पक्ष्याच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. डीडीटी या कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणातील हे याच्या दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण होते. सरासरी 250 ते 300 किमी प्रती तास एवढ्या वेगाने ससाणा आपल्या शिकारीचा पाठलाग करू शकतो.
ग्रे नेक बंटींग (करड्या मानेचा भारीट किंवा करड्या मानेची रेडवा) :
हा पक्षी आकाराने चिमणीएवढा असतो. नराच्या डोक्याचा रंग राखाडी असतो. त्याच्या डोळ्यांभोवती पांढरे ठळक कडे असतात. शेष भागाचा रंग तपकिरी असून त्यावर तांबूस झाक असते. पाठीवर गर्द रेषा असतात. शेपटी तपकिरी व दुभागालेली असते. कंठ लालसर पांढरा असतो. छाती तांबूस असते. मादी दिसायला नरासारखीच मात्र काहीशी फिक्या वर्णाची असते. हे पक्षी पश्चिम व मध्यभारत, उत्तर गुजरात, सिंध, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात आढळतात. हे पक्षी पाषाणयुक्त झुडपांचा प्रदेश, माळराने आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात.
पॅसिफिक गोल्डन प्लोवर (राखाडी चिखल्या):
हा पक्षी आकाराने तितराएवढा असून याचे डोके जाड, पाय काटकुळे, चोच कबुतरासारखी असते. रंग वरच्याबाजूने उदी, त्यावर पांढऱ्या व सोनेरी टिकल्या, खालून पांढरा, छातीवर बदामी, करडा व त्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. उडताना पंखाची टोके टोकदार दिसतात व त्यावर पट्टे नसतात. शेपटी पंख्याप्रमाणे पसरलेली असते. उन्हाळ्यात-म्हणजे विणीच्या हंगामात खालून काळी असते. थंडीच्या दिवसात पाहुणे म्हणून आल्यावर, तसेच, वसंतात जाताना ते खालून रंगीबेरंगी आणि काळे-पांढरे दिसू लागतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी भारतीय उपखंड, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटात हिवाळी पाहुणे म्हणून असतात.
लॅनियस शॅक (खाटीक):
साधारण २५ सेमी आकाराचा हा पक्षी आहे. तो राखाडी, पांढरा, तांबूस-तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो. याचे डोके राखट, पाठीचा खालचा भाग आणि कंबर तांबूस-तपकिरी, पोट पांढरे तर शेपूट काळी असते. टोळ, नाकतोडे, बेडूक, सरडे लहान पक्षी, रान उंदरांची पिल्ले, इ. या पक्ष्याचे भक्ष्य आहे. हा पक्षी संधी मिळाल्यावर गरजेपेक्षा जास्त प्राण्यांची शिकारकरून ठेवतो व उरलेले खाद्य झाडांमध्ये खोचून ठेवतो. यामुळे याला खाटिक असे नाव दिले गेले आहे. हा पक्षी इतर पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो. सहसा शेतजमीन, मोकळे, विरळ जंगल आणि काटेरी झुडुपांच्या प्रदेशात हा पक्षी दिसतो. पाकिस्तान, नेपाळ, भारत, बांगलादेश तसेच श्रीलंका, मालदीव, अंदमान-निकोबार बेटे या भागात हिवाळी पाहुणा असतो.