पालघर - जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी रविवारी श्रमिक विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यप्रदेश राज्यातील कामगारांना विशेष रेल्वेने रवाना होण्यासाठी साडेतीन ते चार वाजेदरम्यान पालघर रेल्वे स्थानकात आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली. यानंतर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या सर्व बाराशे प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या मंडळींना रेल्वे फलाटावर प्रवेश करण्याची मागणी रेल्वे पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणावरून नाकारली. यामुळे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देखील या सर्व मंडळीना रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या आवारामध्ये गर्दी करून बसावे लागले. गाडी रेल्वे फलाटावर लागत नाही तोपर्यंत या सर्व प्रवाशांना बाहेरच ताटकळत राहावे लागले. यामुळे मात्र पालघर रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले