पालघर - अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 2 पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. हलोली पाडोसपाडा येथील समिरा हॉटेलच्या आवारात ही कारवाई केली आहे.
सुशांत सुनील सिंनर (वय 25) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुबंई- अहमदाबाद महामार्गावर हलोली पाडोसपाडा येथील समिरा हॉटेलच्या आवारात अवैध शस्त्रास्त्र विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 14 ऑक्टोबर रोजी सापळा रचून पोलिसांनी सुशांत सिंनर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तूल व काडतुसे सापडली. मनोर पोलीस ठाण्यात सुशांतविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959चे कलम 3, 25 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.