पालघर - वाणगाव येथील वृंदावन दर्शन अपार्टमेंट इमारतीतील सदनिकेत भिंतीआड दडवून ठेवलेला एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह इमारतीच्या सदनिकेत भिंतीआड दडवून ठेवला होता. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या मदतीला मनसेसह भाजपचे नेते
बेपत्ता होती तरुणी
उमरोळी येथील अमिता मोहिते ही तरुणी 4 महिन्यांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह करण्यास घरातून निघून गेली. मात्र, ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. या 4 महिन्यांच्या काळात तरुणीचा प्रियकर तिचे सोशल मीडिया अकाउंट वापरून तसेच, व्हॉट्सअॅपद्वारे तरुणीच्या घरच्यांशी त्यांची मुलगीच बोलत आहे, असे भासवून संपर्कात होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना प्रियकराने दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाणगाव येथील वृंदावन दर्शन अपार्टमेंट इमारतीच्या सदनिकेच्या भिंतीआड या तरुणीचा मृतदेह ठेऊन या तरुणाने स्वतः भिंतीवर बांधकाम केले. शिवाय, तरुणीचा मृतदेह भिंतीत पुरून ठेवलेल्या याच सदनिकेत तो मागील चार महिन्यांपासून भाडे तत्त्वावर रहात होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय