पालघर- वाडा तालुक्यात असलेल्या डाहे गावातील रमेश देव गवळी या व्यक्तीचा सर्प दंशाने मृत्यू झाला आहे. मात्र, पुढील उपचारासाठी जायला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थ व नातेवाईकांकडून केल्या जात आहे.
रमेश गवळी हे १७ नोव्हेंबर रोजी शेतात असताना त्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास संर्प दंश झाला. त्यांना उपचारासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तब्येत अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर, रमेश गवळी यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हालविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेला दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. मात्र, तीन तासाहून अधिक कलावधी उलटून देखील रुग्णवाहिका आली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व डाहे ग्रामस्थ जगदीश कोकाटे यांनी केला आहे.
तर याबाबत वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाच्या उजव्या पायाला दोन ते तीन ठिकाणी विषारी सापाचा सर्प दंश झाला होता. रूग्णाची तब्येत गंभीर होती. यावेळेत पुढील उपचारार्थ पाठवण्यासाठी १०८ या क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध न होऊ शकल्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला.