पालघर - वसई महामार्गावरील वसई फाटा येथे एका व्यक्तीकडून दुर्मिळ प्रजातीतील मांडूळ साप वालीव पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या मांडूळ सापाची औषधे बनविण्यासाठी व काळी जादू करण्यासाठी एक कोटी रुपयांना विक्री करण्यात येणार होती.
हेही वाचा- IPL Auction २०२० : लिलावाला सुरूवात, मुंबईच्या संघात हा धडाकेबाज फलंदाज
पोलिसांनी सापळा रचत सदर आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई फाटा येथे बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दुर्मिळ प्रजातीतील मांडूळ सर्प विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वालीव पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर परिसरात सापळा रचला असता एक संशयास्पद व्यक्ती आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे दुर्मिळ असा दुतोंडी मांडूळ साप आढळून आला. या सापाची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगण्यात आले. आरोपीने मांडूळ या दुर्मिळ प्रजातीचा साप 'चिफ वाईल्ड लाईफ वार्डन' यांच्या पूर्व परवानगी शिवाय अवैधरित्या बाळगला होता.
आतिक शकील कुरेशी (वय २९) असे आरोपीचे नाव असून तो वसई कोळीवाडा येथे राहणारा आहे. हा मांडून कोणाकडून घेतला व त्याची विक्री तो कोणाला करणार होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत. वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवींद्र नाईक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर व वसई युनीटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक कोटी रुपये किंमत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सिद्धवा जायभाये यांनी दिली. या मांडूळ सापाची वजनानुसारही किंमत ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. वसई न्यायालयात आरोपीला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.