पालघर (वाडा)- वाडा येथील महापारेषणच्या उच्चदाब उपकेंद्रातून वाडा आणि परिसरास वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, वैतरणा नदीवरून येणाऱ्या या वीज वाहिन्या, आठ फिडरचे पोल व कन्डक्टर रविवारी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. असे असले तरी रविवारी रात्री आणि सोमवारी वाडा परिसरातील बहुतांश ग्राहकांचा वीज पुरवठा पर्यायी यंत्रनेद्वारे पूर्ववत करण्यात आला आहे. सध्या या वाहिन्यांवरील फक्त सात उच्चदाब केंद्र बंद आहेत.
५ ऑगस्ट पासून वैतरणा नदीतून वाहून गेलेली वीज यंत्रणा पुन्हा उभा करण्याचे काम सुरू आहे. या कामी महावितरणचे दहा अभियंता, पाच कंत्राटदार व १२५ कामगार अथक प्रयत्न करत आहेत. सोमवारी या कामाची पाहणी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केली. यावेळी वसई विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल व इतर अधिकारी उपस्थित होते.