पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र. एन-२१६ आणि एन-२१७ स्थित बजाज हेल्थ केअर, या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, या कंपनीत घातक प्रदूषण आणि विनापरवानगी रासायनिक उत्पादन करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे बजाज हेल्थ केअरमधील उत्पादन बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. तसेच कारखान्याची वीज आणि पाणी पुरवठा तोडण्याचेही आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून तपासणी -
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. याविरोधात अखिल भारतीय मांगेला समाजाने राष्ट्रीय हरीत लवादाकडे जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची गांभीर्याने दखल घेत लवादाने यासाठी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि प्रदुषणकारी कारखान्यांना जबाबदार धरले. तसेच त्यांना तब्बल १६० कोटींचा दंड ठोठावला होता. इतकी मोठी कारवाई होऊनही तारापूरमधील कारखान्यांतून होणारे जलप्रदूषण अजूनही सुरूच आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बजाज हेल्थ केअर या कारखान्याची २ डिसेंबर २०२० आणि ५ मार्च २०२१ रोजी तपासणी केली होती. यावेळी बजाज हेल्थ केअर या कारखान्यात लुमीफण्ट्राईन अस्कोर्बिल पाल्मीटेट, अरटेमीथर ग्लिकाझाईड, निमुसुलाईड, अल्बेनडाझोल, साट्रीरीनिडाझोल आणि डोक्सोफिलाईन सारख्या उत्पादनांचे अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय उत्पादन घेतले जात असल्याचे निदर्शनास आले होते.
हेही वाचा - पुण्यात कोरोनाचा थैमान असतानाही जम्बो कोव्हिड रुग्णालयाची वीज जोडणी कापली
उत्पादने बंद करण्याचे आदेश -
रासायनिक घनकचरा वेगळा करणे, जमा करणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव, फेब्रुवारी २०२०पासून रासायनिक घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणे, इ. कारणांसाठी या कारखान्याला जबाबदार धरले. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी कारखान्यातील सर्व उत्पादने ७२ तासांत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच कारखान्याची वीज आणि पाणी पुरवठादेखील बंद करण्याचे आदेश महावितरण आणि एमआयडीसीला देण्यात आले आहेत.
हेही वाचा - पालघरमध्ये राहणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी घेतले ताब्यात