पालघर: गझनीच्या स्वारीनंतर डहाणूचे महालक्ष्मी मंदिर तोडण्यात आले. पुढे मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुढे पुन्हा मंदिरांची उभारणी करण्यात आली. या मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायिका आहेत. महालक्ष्मी देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असेही सांगितले जाते. देवीचे मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवरील चारोटी नाक्यापासून चार किलोमीटर असलेल्या विवळवेढे गावाजवळील गडावर आहे.
हा आहे नियम: प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा आणि चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम केला जातो. वाघाडी येथील सातवी कुटुंबाला ध्वज लावण्याचा मान दिला आहे. ध्वज लावणारा व्यक्ती व्यसनांपासून दूर राहून ब्रम्हचर्याचे पालन करतो. देवीच्या गडावर फाल्गुन वद्य अष्टमीपासून चैत्र वद्य अष्टमीपर्यत पंधरा दिवस यात्रा-उत्सव भरविला जातो. विशेष म्हणजे, ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचावर आहे. आश्चर्य म्हणजे या उंच ठिकाणावर पाण्याचा झरा आणि कुंड आहे. तेथील पाणी कधीच कमी होत नाही.
सुरक्षेचा बंदोबस्त: महालक्ष्मी देवीची यात्रा पाच एप्रिल पासून सुरू होणार आहे. सलग १५ दिवस चालणारी ही जिल्हातील सर्वांत मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई बरोबरच शेजारील गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने देवीच्या दर्शनाला येथे येत असतात. सतत १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत लाखो भाविक येतात. त्यामुळे यात्रेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निगराणी ठेवली जाणार आहे. या वर्षी यात्रेला रात्री 10 पर्यंतचा वेळ असेल. यात्रेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. गर्दी जास्त होत असल्याने या वर्षी देवीचे मुख दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिरट्रस्ट कडून भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी रेलिंग शेड उभारले आहेत. दर्शन सुरळीत होण्यासाठी 20 सुरक्षा रक्षक, 10 स्वयंसेवक तर साफसफाई साठी १५ सफाई कामगार यांची नेमणूक केली असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात साठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
हेही वाचा: Physical Abuse Of Minor Boy : कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, ४० वर्षीय नराधमाला अटक