पालघर - अरबी समुद्रात 'महा'चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ 6 ते 8 नोव्हेंबरला गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. या वादळाचा फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्रकिनारी राहणाऱ्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केले आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण 2 हजार 774 बोटी आहेत. त्यापैकी 288 बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून त्यापैकी 150 बोटी या रोज ये-जा करणाऱ्या आहेत. त्यांना माघारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 138 मासेमारी बोटी या 10 नोटिकल मैलपेक्षा आत खोल समुद्रात मासेमारी करत आहेत. या बोटींसोबत संपर्क साधून त्यांना परत येण्याच्या सूचना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आता कुठल्याही मच्छिमारांनी पुढील तीन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हे वाचलं का? - महा चक्रीवादळाचे सावट; मुंबईसह उरण, रत्नागिरी येथील 34 मासेमारी बोटी डहाणू बंदरात आश्रयाला
चक्रीवादळाचा प्रभाव पाहता जिल्ह्यात वसई तालुक्यात 29, पालघरमध्ये 25, डहाणूत 12 व तलासरी तालुक्यात 1 अशा समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या 67 गावांमध्ये दवंडी पिटवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमार्फत बैठक घेण्याचे तसेच प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.