पालघर - पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदराचे वारे पुन्हा वाहू लागले असून केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाढवण बंदराला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. ही माहिती समोर येताच पुन्हा स्थानिक आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. वाढवण विरोधी संघर्ष समिती तसेच स्थानिकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून प्रस्तावित बंदराविरोधात अधिक प्रखरतेने अखेरपर्यंत लढत राहू, असा पवित्रा घेतला आहे. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात देखील जाण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
वाढवण बंदराला विरोध म्हणून या परिसरातील स्थानिक जनतेने अनेक आंदोलने करून आपला विरोध दर्शवला आहे. विधानसभा निवडणुकीत देखील वाढवून परिसरातील गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तसेच सर्वच पक्षाच्या नेत्यांनीही स्थानिकांना वाढवण बंदर रद्द करण्यासंबंधी वेळोवेळी आश्वासन दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या संदर्भात आम्ही जनतेच्या बाजूने राहू अस आश्वासन दिले होते. परंतु आता केंद्राने या बंदराला हिरवा कंदील दाखवल्याने पुन्हा एकदा राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपविरोधी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे तत्कालीन काँग्रेसचे राज्यमंत्री असताना आणि सध्या शिवसेनेकडून पालघरचे खासदार असलेले राजेंद्र गावित यांनी या बंदर विरोधी भूमिका घेत पहिला बुलडोजर माझ्यावरून चालावा नंतर बंदर करा, असा नारा दिला होता. मात्र आता केंद्राने घेतलेल्या या भूमिकेकडे राज्य सरकार कसे पाहते, हे पहावे लागेल.