पालघर - अवैधरित्या मद्य तस्करी करणाऱ्या तस्करांचा डाव राज्य उत्पादन शुल्क पथकाने हाणून पाडला आहे. कोकण विभागाने केलेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कारसह सहा लाख 35 हजार किंमतीच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या 155 मद्याच्या बाटल्यांसह बनावट मद्य बाटल्या निर्मितीसाठी लागणाऱ्या ब्रँडेड रिकाम्या बाटल्या, लेबल्स, झाकणे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी काही तस्कर चराचाकीने येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी(दि.३जानेवारी)ला भरारी पथकाचे निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षक अनिल राठोड, आदींच्या पथकाने वसईत सातिवली येथे पुलाच्या खाली सापळा रचला.
मद्य भरलेल्या एका चारचाकी वाहनासह रामकिशोर निषाद, मुखलाल निर्मल आणि भवानीदिन निषाद या तिघांना ताब्यात घेतले. वाहनामध्ये 750 मिली च्या 155 सीलबंद बाटल्या तसेच अन्य साहित्यासह तब्बल सहा लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.