पालघर - कोरोना विषाणुची झळ आता आता ग्रामीण भागालासुद्धा लागायला सुरुवात झाली आहे. उपचार करण्याऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी वसई तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 100 पीपीई कीट प्राथमिक आरोग्य केंद्र पारोळ येथे भेट दिल्या आहेत. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी पाटील यांचे आभार मानले.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वसई शहरी भागात रुग्णांचा आकडा शंभरहून अधिक झाल्याने रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. रुग्णांची सेवा करताना अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वसई पूर्व भागात कोरोनाचा रुग्ण अजूनही सापडला नसला तरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे कीट दिल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी नागरिकांनीही यंत्रणेला साथ देत घरात राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी खाजदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी बांधकाम सभापती पांडुरंग पाटील, वसई तालुका काँगेस अध्यक्ष राम पाटील व तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर होते.