पालघर - विरार पूर्वेतील बावखल गावातील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे गेल्या ३ दिवसांपासून ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. महावितरणसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी ग्रामस्थांचे फोन देखील घेत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा - औरंगाबादच्या बिडकीनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, मोबाईल शॉपीसह चार दुकाने फोडली
विरार पूर्व कण्हेर पोलीस चौकी हद्दीत बावखल गाव आहे. जवळपास १०० हून अधिक कुटुंबे या गावात वास्तव्यास आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील एकमेव ट्रान्सफॉर्मरची नासधूस केली. तसेच त्यामधील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लहान मुलांसह महिला, वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण अधिकारी नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी चालढकल करत असल्याने अजून किती दिवस आम्ही अंधारात राहायचे? असा सवाल गावकरी करीत आहेत. या प्रकाराबाबत महावितरण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रान्सफॉर्मर लावून देणार असल्याचे सांगितले. मात्र कधी लावणार? हे न सांगितल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.
शिरुर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ; एका गावातील ४ दुकाने फोडली तर एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला