पालघर - तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. तसेच डहाणू परिसरातील बोर्डी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विरोधकांच्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. ''पी हळद आणि हो गोरी' अशी त्यांची नीती आहे' असा टोला आव्हाडांनी विरोधकांना लगावला.
'नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करणार'
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिकू, आंबा तसेच भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी बोर्डीत जाऊन पाहणी केली. 'या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. तसेच अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी जास्तीत-जास्त मदत करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांना करणार आहे', अशी ग्वाही यावेळी आव्हाडांनी दिली.
विरोधकांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणचा दौरा तीन तासात आटोपला. यावरून विरोधकांना मुख्यमंत्र्यांवर टीका केली. विरोधकांच्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. ''पी हळद आणि हो गोरी' अशी त्यांची नीती आहे' असा टोला आव्हाडांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा - अन् लसीकरणासाठी माणसांऐवजी लागल्या चपलांच्या रांगा