पालघर - चिन्ह वाटपापासून सेना-भाजपचा रडीचा डाव सुरू आहे. रवींद्र फाटक हे ठाण्यातील असून पालघर लोकसभा मतदार संघातील नाहीत. तरीसुद्धा त्यांचा वावर या लोकसभा क्षेत्रात कसा. ते इतक्या रात्री काय चणे कुरमुरे विकायला येथे आले होते का? असा सवाल बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांना विचारला.
रवींद्र पाठक आमच्या गुंडगिरी विषयी बोलतात पण त्यांच्या गाडीत पैसे सापडले त्याबद्दल काय? रवींद्र फाटक यांची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या गाडीत रोकड असल्याची तक्रार करत बहुजन विकास आघाडीने काल रात्री जवळपास ३ तास फाटक यांची गाडी अडवून, बॅग तपासणीची मागणी केली होती. यामुळे रात्री नालासापोरा पूर्वमध्ये तणावाचे वातावरण होते. सेना आणि बविआचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.
निवडणूक भरारी पथकाने फाटक यांच्या गाडीत लिफाफ्यात असलेली 64 हजार रुपयांची रोकड केली असून त्यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्यात झालेल्या बाचाबाची प्रकरणी वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांच्यासह बविआ सेनेच्या 60 जणांविरोधात 143, 341, 323 नुसार तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.