पालघर - पालघर परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलेले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. गोठणपूर येथील पालघर नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाळीतील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे.
घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वसाहत परिसरातील गटारांचे काम व साफसफाई झाली नाही. त्यामुळे थोडासाही पाऊस झाला तरी पाणी साचते. नाले-गटारे भरल्यामुळे सर्व सांडपाणी वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या घरात शिरते. अनेक वर्षापासून पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत आहे. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.