पालघर - भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असून लवकरच आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण होत असून लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरू होईल. पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोहळा हा नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणावर होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील पर्जन्यमानाविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे मृत झालेल्या व्यक्तींना 48 लाखाची मदत देण्यात आली आहे. तसेच मृत जनावरांच्या कुटुंबांना नुकसानीपोटी 1 लाख 98 हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या 600 घरांना 33 लाख 56 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाच्या धक्क्यांमुळे बाधित 1793 घरांना शासन निर्णयानुसार 6 हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 7 लाख 58 हजारांची तर दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.
आदिवासी बहुल जिल्हा असूनही औद्योगिकरणात राज्यात पालघर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील मनोर येथे दोनशे खाटांचे सामान्य रुग्णालय व वीस खाटांचे ट्रॉमा केअरचे बांधकाम सुरू झाले आहे. तसेच पालघर येथे दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मंजूरी मिळाली असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध आहे. बोईसर व वाणगाव येथेही प्रत्येकी 30 खाटांच्या रुग्णालयाचे विस्तारीकरण सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील केळवा, बोर्डी, डहाणू या ठिकाणचे समुद्रकिनारे विकसित करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात येत असून यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. पालघर पोलीस दलाच्यावतीने स्वतंत्र डिजीटल दूरसंचार व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पालघर पोलीस मुख्यालय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांशी सदैव संपर्कात राहून यापुढे पालघर पोलीस दल जास्तीत जास्त लोकाभिमूख होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.