नालासोपारा/पालघर - नालासोपाऱ्यात कोरोनाने थैमान घातले आहे. नालासोपारा पूर्व हे तर कोरोनाचं हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे ठरलेले लग्न लांबणीवर गेले आहे. अनेकांनी विवाहकार्य पुढे ढकलले आहेत. तर काहींनी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकला. मात्र, नालासोपाऱ्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. नालासोपाऱ्यात नवरदेवाने चक्क पीपीई किट घालून तर नवरीने मास्क आणि प्लास्टिक हेल्मेट घालून साता-जन्माच्या शपथा घेतल्या आहेत.
नालासोपारा कडील बिलालपाडा परिसरात राहणारे 27 वर्षीय संजय गुप्ता आणि 23 वर्षीय बबिता गुप्ता यांचा अनोखा विवाहसोहळा पार पडला. संजय गुप्ता आणि बबिता गुप्ता या दोघांचे लग्न एप्रिल महिन्यात ठरले होते. मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र, हे लॉकडाऊन लवकरच संपेल आणि आपला विवाह होईल, अशी आशा या दोघांनाही होती. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर याच परिस्थितीत लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला.
दोन्ही परिवाराच्या संमतीने त्यांनी घरातल्या घरात अगदी 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्याच ठरवले. नालासोपारा पूर्व बिलालपाडा परिसरात राहत्या घरातच 14 जून रोजी त्यांनी हा विवाह उरकला. मात्र, यावेळी नवरदेवाने लग्नासाठी छान साजेसा पोशाख परिधान करण्याऐवजी चक्क पीपीई किट परिधान केले. पीपीई किट घालूत तो बोहल्यावर चढला. सुरुवातीला सर्वांना हे अजब वाटले. मात्र, नंतर सर्वांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले. अशा प्रकारे विवाह करत असताना सुरक्षित वावर आणि मास्क परिधान करत अगदी सरकारी नियम पाळूनच हा विवाह उरकल्याचं संजय गुप्ता यांनी सांगितले.
कोरोनाच्या कालावधीत अनेकांनी काहीतरी वेगळे करत विवाह करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजयचा हा अनोखा उप्रकम इतरांना प्रेरणा देणारा आहे. सध्या परिसरात पीपीई किट परिधान केलेल्या नवरदेवाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा - मनोरमध्ये किराणा दुकानात सव्वा लाखाची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
हेही वाचा - शिरगाव समुद्र किनाऱ्यावर तेलाचा तवंग; समुद्र किनारा दिसतोय विद्रूप