पालघर- नालासोपारा पूर्व पेल्हार फाट्यावरील ओम साईराम मोटरसायकल शोरूममध्ये घुसून काही गुंडांनी हैदोस घातला होता. गुंडांनी शोरूमच्या मालकाला बेदम मारहाण करीत शोरूमची पूर्णपणे तोडफोड केली होती. तोडफोड आणि मारहाणीचा हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेत शोरूम मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहे. मात्र, या गंभीर घटनेनंतरही वसईतील वालीव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
संदीप बाबुराव राठोड असे मरहाण झालेल्या शोरूम मालकाचे नाव आहे. संदीप यांचे नालासोपारा हद्दीतील पेल्हार फाट्यावर ओम साईराम मोटर्स नावाचे शोरूम आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शोरूम मालक आपल्या काऊंटरवर बसले असताना अचानक तीन ते चार गुंड शोरूममध्ये शिरले, त्यांनी शैलेश गुप्ता या व्यक्तीला २०१८ मध्ये विक्री केलेल्या मोटारसायकलच्या थकबाकीवरून शोरूम मालक संदीप राठोड यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आतच गुंडांनी राठोड यांना लाथा बुक्क्यांसह खाली पाडून बेदम मारहाण केली.
गुंडांनी दुकानातील काचा, टेबलांची तोडफोड केली असून बंदूक आणि पिस्तुलने धमकी दिल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या संदीप राठोड यांच्यावर महामार्गावरील हायवे रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुंडांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- COVID-19: 'सफाई कामगारही माणसचं, त्यांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष '