पालघर (वाडा) - जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीच्या जवळपास असलेल्या अतिदुर्गम भागातील ५ महसुली गावांचे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासाठी विस्थापन होणार आहे. या गावांचे वाडा तालुक्यातील शासकीय भागात पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाने तालुक्यात कायम टंचाईच्या छायेत असलेली गावे ही मुंबई महापालिकेसाठी उठवली जाणार आहेत.
पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यात पाचघर, खोडदे, ओगदा, फणसगांव, तीळमाळ अशी ५ गावे आणि वाडा तसेच मोखाडा तालुक्याच्या सीमारेषावरील एका गावाचा समावेश आहे. तर तालुक्यातील वरील ५ महसुली भागात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत असते. तेथे पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या गावाचे टंचाईचे शुक्लकाष्ठ सुटत नाही तेच मुंबई महानगरपालिका येथे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे येथील १०० कुटुंबाला आपले गाव सोडावे लागणार आहे.
पाणी नसणाऱ्या गावी गारगाई प्रकल्पाने धरण बांधले जाणार आहे. त्या धरणाचे पाणी मुंबई महानगरपालिका नेणार आहे. या धरणाचे काम तातडीने होण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्त भागातील कुटुंबाचे पुनर्वसनाबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नुकतेच ९ जुलैला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी, मुख्य अभियंता, पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संदीप पवार आणि वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे आदी अधिकारीवर्ग तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबाला पुनर्वसन करण्यात येणाऱ्या शासकीय जागा दाखविण्यात आल्या आहेत.
या पुनर्वसनात घर बांधणीसाठी प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये, जर कुटुंबातील व्यक्ती नोकरी करण्यास तयार असेल त्यास नोकरी आणि जर नोकरी करण्यास तयार नसेल तर त्या कुटुंबाला ५ लाख रुपये, जेवढे जागेचे क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्राची जमीन प्रकल्पग्रस्त बाधितांना मिळणार आहे. तसेच शिक्षणाचा खर्च मुंबई महापालिका उचलणार, अशा प्रकारचा मोबदला मिळणार आहे. या गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पामुळे ६०० हेक्टर जमीन बाधीत होणार आहे. तसेच पुनर्वसनाबाबत येत्या २३ जुलैला ग्रामपंचायतीकडून सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी बोलताना सांगितले.