नालासोपारा (पालघर) - नालासोपारा येथे एका घरकाम करणाऱ्या महिलेवर त्रिकुटाने नोकरी देण्याच्या नावाखाली चार वेळा सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान नगर परिसरात राहाणाऱ्या दोन तरुणांनी एका 37 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर चारवेळा सामुहिक अत्याचार केला आहे. महिला ज्या परिसरात काम करत होती. त्या परिसरात एक डिलिव्हरी बॉय सतत येत होता. त्यातून त्या दोघांची ओळख झाली. दरम्यान या डिलिव्हरी बॉयने या महिलेला चांगल्या ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, तीला दुचाकीवरून हनुमान नगर परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये नेले. तिथे त्याचा एक मित्र आधीच होता. दोघांनी मिळून या महिलेवर अत्याचार केला. व त्याची चित्रफित तयार केली. दरम्यान त्यानंतर तिला धमकावून तिच्यावर चारवेळा अत्याचार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पीडितेचा नंबर त्यांच्या दुसऱ्या एका मित्राला दिला. त्याने देखील पीडितेला धमकाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
आरोपींना अटक
या प्रकरणी पीडितेने आरोपींविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अमित तिवारी २३, पवन द्विवेदी २१ आणि धीरज पाल २१ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.