पालघर (वसई) - वसई-विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वाडकर ( Dr Sunil Wadkar Arrest ) यांना मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने व वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी संयुक्त कारवाई करून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर विरार पोलिसांनी डॉ. वाडकर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून ( Dr Wadkar Fake Medical Degree ) आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम 1961 ( Maharashtra Medical Practice Act 1961 ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. वाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल -
डॉ. सुनील वाडकर हे वसई-विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी ( Former Medical Officer Vasai Virar Muncipal Corporation ) होते. सध्या ते विरार महामार्गावर 'हायवे' (Highway Hospital ) आणि नालासोपारा येथे 'नोबेल' ( Nobel Hospital ) अशी दोन खासगी रुग्णालये चालवतात. त्यांची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने व वसई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी ही कारवाई केली आहे.
आमच्याकडे डॉ. वाडकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर आम्ही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन तपासणी केली. त्यावेळी डॉ. वाडकर यांच्याकडे एमबीबीएसची पदवी नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष चोधरी यांनी दिली. डॉ. वाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पदवी खरी आहे की खोटी याचा तपास करत असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.