पालघर - विरार येथे एका इमारतीमधील सदनिकेत डांबून ठेवलेले तब्बल १६ मांजरे व ७ कुत्रे सापडले आहेत. तसेच त्यात मृतावस्थेतील कुत्रे आणि मांजरी देखील आढळले आहेत. या प्रकरणी सदनिकेत राहणाऱ्या तीन महिलांविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
विरार पश्चिममधील ग्लोबलसिटी येथील रुस्तमजी एम-४, अव्हेन्यू रूम नंबर २०१ ही सदनिका बर्नाड डेविड कार्व्हलो यांनी शेहनाज जानी या महिलेला भाड्याने दिली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली राहणार असल्याची व आपण सोबत दोन कुत्रे ठेवणार असल्याची माहिती त्यांनी घर मालकाला दिली होती. काही महिन्यानंतर या सदनिकेतून दिवसा, रात्री-अपरात्री कुत्रे मांजरींच्या ओरडण्याचा आवाज येण्याच्या तक्रारी या इमारतीतील रहिवाशांनी घर मालकाकडे तसेच सोसायटीचे सेक्रेटरी यांच्याकडे केल्या.
त्यानंतर इमारतीतील रहिवासी व सेक्रेटरी यांनी विचारणा केली असता, आपल्याकडे १६ मांजरे, ७ कुत्रे असल्याचे शहनाज यांनी सांगितले. त्यावेळी आपण परवानगीशिवाय इतके प्राणी आपल्या घरात ठेवणे चुकीचे असल्याचे इमारतीतील लोकांनी सांगितले, तेव्हा आपण पंधरा दिवसातच या सर्वांना पुणे येथे शिफ्ट करत असल्याचे शहनाज यांनी सांगितले. मात्र, महिनाभर उलटला तरीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे काहीच केले नाही. त्यांच्या सदनिकेतून प्राण्यांच्या दुर्गंधीचा वास व आवाजाचा त्रास आणखी वाढतच गेला. घरमालकांनी व इमारतीतील सदस्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला असता, त्यांना घरात कुत्रे, मांजरी सर्वत्र त्यांचे मलमूत्र व कचरा पडलेला आढळला. त्यानंतर सोसायटीच्या कचऱ्याच्या डब्ब्यात तपासणी केली असता त्यात कुत्रे व मांजराचे शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळले आहे. त्यामुळे हे कुटुंब या प्राण्यांचा वापर कश्यासाठी करत होते? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
यानंतर रेजिनाल्ड परेरा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या कर्मचारी यांनी शहनाज जानी, फराह जानी व आयशा जानी या तिघांविरोधात कुत्रे-मांजरी डांबून ठेवल्याची तक्रार अर्नाळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.