पालघर - तांदुळवाडी किल्ल्यावर वाट चुकलेल्या पर्यटकाचा शोध घेत त्याला सुखरूप पायथ्याशी आणण्यात स्थानिकांना यश आले आहे. अमेय भूषण परदेशी असे या पर्यटकाचे नाव असून स्थानिकांनी त्याला किल्ल्याच्या पायथ्याशी सुखरूप आणल्यानंतर पर्यटकाने सुटकेचा निश्वास सोडला.
पर्यटकाला स्थानिकांनी सुखरूप आणले पायथ्याशी -
पालघर येथील अमेय भूषण परदेशी हा ३५ वर्षीय तरुण पर्यटक सोमवारी तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. रस्ता भरकटला आणि कोणत्या दिशेने किल्ल्याच्या पायथ्याशी उतरावे, हे कळत नव्हते. किल्ल्यावर वाट चुकलेल्या या पर्यटकाने तांदुळवाडीचे सरपंच रमेश चावरे आणि पोलीस पाटील सुजित पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर सरपंचांनी गावातील बाळाराम तुंबडा, वेदांत बाॅगे, दुर्वास पालवा आणि सफाळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुभाष राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास किल्ल्यावर शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दोन तासांच्या अथक परिश्रमाने पर्यटकाचा शोध घेत त्याला सुखरूप किल्ल्याच्या पायथ्याशी आणले.
तांदुळवाडी किल्ल्यावर अनेकदा भरकटतात पर्यटक -
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले गड-किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक तांदुळवाडी (सफाळे) येथे येत असतात. पर्यटकांना आपला वेळ कसा जातो ते समजून येत नाही. निसर्गाच्या मनमोहक सौंदर्यात ते रममाण होतात, वेळेचे भान विसरतात. अंधार झाल्यानंतर पर्यटकांना किल्ल्यावरून कोणत्या दिशेने खाली उतरावे हे सूचत नाही. अनेक पर्यटक या परिसराची माहिती नसल्याने रस्ता भरकटतात.