पालघर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात पंचनामा केल्यानंतर वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जोरदार पावसाने इथल्या भातशेतीचे मोठे नुकसान केले.
सर्वाधिक नुकसानबाधीत क्षेत्र वाडा तालुका
तालुक्यातील 14 हजार 19 हेक्टर क्षेत्र भात पिकाच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी 10 हजार 155 हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. या नुकसानामुळे 19 हजार 471 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भात पिक पाण्याखाली गेल्याने भात पिकांना कोंब आले आहेत. पालघरमधील हवालदिल शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे. राज्य शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली आहे. नुकसानग्रस्तांनी राज्य शासनाकडे नुकसान भरपाई म्हणून 6 कोटी 90 लाख रुपयांची मागणी केली आहे. याबद्दल वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी माहिती दिली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बाधित क्षेत्राची आकडेवारी जास्त असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक के. तरकसे यांनी दिली.
हेही वाचा - तीन महिन्यांपासून पगार नसल्याने घराच्या कर्जाचे हफ्ते थकले; त्याच नैराश्यातून 'मनोज' यांनी केली आत्महत्या!
लोकप्रतिनिधींकडून पाहणी दौरे
वाडा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांनी जिल्ह्यातील पाहणी केली. विक्रमगड, वाडा आणि पालघर याभागात आमदार निरंजन डावखरे, आमदार सुनील भुसारी आणि आमदार श्रीनिवास वणगा यांनी हजेरी लावली होती.