पालघर - अती पावसामुळे चिकू फळाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. यामुळे बागायदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान बागायतींचा पंचनामा करून प्रतिहेक्टरी साडेतीन ते 4 लक्ष नुकसान भरपाई आणि वर्षभर वीज बिल माफ करावे, अशी मागणी बुधवारी (6 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्यावतीने शासनाला करण्यात आली.
याबाबतचे निवेदन डहाणूचे सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना या संघाचे अध्यक्ष विनायक बारी, सचिव मिलिंद बाफणा, खजिनदार यज्ञेश सावे आणि उपस्थित बागायदारांनी दिले.
या वर्षी जून ते नोव्हेंबर या कालावधीत पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात 12 जून आणि 13 जून रोजी वायू वादळ, त्यानंतर 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान ढगफूटी, 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर अतिवृष्टी आदींचा सामना करावा लागला. त्यानंतर 23 ऑक्टोबर पासून अवकाळी आणि परतीचा पाऊस झाला. 'क्यार' आणि आता 'महा' चक्रीवादळाचा धोकाही संभवत आहे.
या सर्वांचा विपरीत परिणाम चिकू बागायतीवर झाला आहे. अति पाऊस, आद्रता यामुळे बुरशीजन्य रोगामुळे फूलं व फळं काळवंडून गळती झाली. जोराच्या वार्यामुळे बागायतींचे नुकसान झाले. त्यामुळे आगामी 20 ते 25 महिन्यांकरिता उत्पादनच येणार नसल्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणा, फळतोड मजुरांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे शासनाने प्रतिहेक्टरी साडेतीन ते चार लक्ष नुकसान भरपाई आणि वर्षभर वीजबिल माफ करण्याची मागणी बागायदारांनी या निवेदनाद्वारे केली आहे.