पालघर - तौक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील जांभूळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बहाडोली येथील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
जांभुळगाव म्हणून प्रसिद्ध आहे 'बहाडोली' गाव-
पालघर तालुक्यातील जांभूळगाव म्हणून बहाडोली हे गाव प्रसिद्ध आहे. संपूर्ण बहाडोली गाव जांभूळ उत्पादनावर आपली आर्थिक घडी चालवतात. गावात साधारणत: 3 हजार 500 च्या आसपास जांभूळ झाडे आहेत. वर्षाकाठी एका झाडापासून साधारणतः 15 ते 20 हजारांचे उत्पन्न मिळते. चक्रीवादळामुळे बहाडोली जांभळाची अनेक झाडे जमीनदोस्त झाली असून झाडाला आलेली फळे देखील झडून गेली आहेत. आधीच कोरोनामुळे येथील जांभळाना बाजारपेठ नाही. त्यात आता चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जांभूळ शेतीचे जवळपास 35 ते 40% नुकसान झालेले आहे.
मंत्र्यांचे दौरे; मात्र नुकसानभरपाई कधी?
गेल्या तीन दिवसासून येथील आमदार, खासदार त्याचबरोबर मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरू आहेत. लवकरच पंचनामे करून नुकसानभरपाई देऊ, अशी आश्वासनेही देण्यात आली. मात्र आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी किती काळ प्रतिक्षा करावी लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.