वाडा (पालघर) - मुसळधार पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा परिसरातील शेतकरी यामुळे चिंताग्रस्त बनला आहे. जिल्ह्यात मान्सूनला 2 जूनपासून सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भात लावणीला लवकर सुरुवात केली होती. धान्य तयार होण्यासाठी लागणारा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तलासरी तालुक्याच्या सूत्रकार गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातील शेतात धान्य काही ठिकाणी गाडलेली आहेत, तर काही ठिकाणी भात पाण्यातच बुडून राहिल्यामुळे कुजून खराब झाले आहे. तलासरी तालुक्यात अजूनही रिमझिम पाऊस सुरूच असल्याने नवीन तयार होणाऱ्या पिकांच्या कणसांमध्ये पाणी जात आहे. यामुळे पिक तयार होण्याअगोदरच ते खराब होत आहे. त्याचबरोबर राबामध्ये लावलेली कडधान्ये, तूर, उडीद, चवळी, ज्वारी अशी अनेक पिके अतिपावसामुळे राबातच कुजून खराब होऊ लागली आहेत. पालघर जिल्ह्यात पुराच्या पाण्याबरोबर गाळही वाहून आला आहे. या गाळामुळे भात पिकेही गाडली जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हेही वाचा - मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र