पालघर - दादरा नगर हवेली येथून अवैध मद्याची वाहतूक करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरने कारवाई केली आहे. या कारवाईत ६५ बॉक्स मद्य, रोख रक्कम व पीकअप टेम्पो, कार असा एकूण १९ लाख ३७ हजार ९६० रुपये किमतीची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
घेतली वाहनांची झडती
कुकडे-नागझरी मार्गावर दादरा नगर हवेली येथील विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनी पोलिसांनी गुंदले गावाच्या हद्दीत एक टेम्पो व त्याच्या पाठोपाठ एक स्विफ्ट कार येताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आपल्या अडवण्याचा प्रयत्न केला असता, यावेळी पिकअप टेम्पो चालक टेम्पो तिथेच सोडून फरार झाला व स्विफ्ट कार मात्र चालकासह रोखण्यात पोलिसांना यश आले. या दोन वाहनांची झडती घेतली असता त्यात दादरा नगर हवेली येथून वाहतूक होत असलेले अवैध मद्य आढळून आले.
१९ लाख ३७ हजार ९६० रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत पिकअप टेम्पो व स्विफ्ट कारमधून पोलिसांना ६५ बॉक्स दादरा नगर हवेली येथील बनावट मद्य तसेच स्विफ्ट कारच्या डॅशबोर्डमधून ४ लाख ३६ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. अवैध मद्य, रोख रक्कम व पिकअप टेम्पो व कार असा एकूण १९ लाख ३७ हजार ९६० रुपये किंमतीची एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
एकाला अटक
पिकअप टेम्पोमधून अवैध मद्याची वाहतूक करणारा टेम्पो चालक फरार झाला असून स्विफ्ट कार चालकास उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. धीरज वसंत पाटील असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात यापूर्वीदेखील अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीस पालघर न्यायालयात हजर केले असता त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत एक्साइज कस्टडीचे आदेश दिले आहेत.