पालघर - वनहक्क दाव्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने निपटारा करण्यासाठी पालघर जिल्हाधिकरी कार्यालयात स्वतंत्र 'जिल्हा वनहक्क समिती कक्ष' स्थापन करण्यात आला आहे. या जिल्हा वनहक्क समिती कक्षाचे उद्घाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वनहक्क दावेधारकांना ताब्यात असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, तसेच निवासी जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उप जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांची उपस्थिती होती.
प्रलंबित वनहक्क दाव्यांचा ३१ मार्चपर्यंत निपटारा करू
२पालघर जिल्ह्यात सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे एकूण ७७८४ दावे प्रलंबित असून, त्यापैकी एकूण ३०२४ वनहक्क दाव्यांना अंतिम मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच उपवनसंरक्षक जव्हार व डहाणू यांच्याकडे १९३३ दावे प्रलंबित आहेत. तर उर्वरीत २७९७ दाव्यांवर जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून कारवाई सुरू असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. तसेच उर्वरित सर्व वनहक्क दाव्यांचा निपटारा ३१ मार्च २०२१ पर्यंत करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.