पालघर- शहरात ईद-ए-मिलादुन्नबीच्या पर्वावर मुस्लिम बांधवांकडून भव्य व शानदार मिरवणूक काढण्यात आली. लहान मुले, तरुणांसहीत सर्व मुस्लिम बांधव विशेष पोशाखात वेगवेगळ्या प्रकारचे साफे बांधून या मिरवणुकीत सहभागी झाले. ईद-ए-मिलाद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शहरातील हिंदू बांधवांतर्फे तसेच शिवसेना पालघरतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरात हिंदू- मुस्लिम ऐक्याचे अनोखे स्वरूप पाहावयास मिळाले.
मुहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावानेही संबोधित केले जाते. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. आज पालघर सुन्नी जमाततर्फे नगर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीला ईदगाह येथे समारोप करण्यात आला. पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे पालघर शिवसेना शहर शाखेतर्फे शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांतर्फे मुस्लिम बांधवांना खजूर व नानखटाईचे वाटप करण्यात आले व त्यांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम नात्याला अधिक बळकटी देऊन सर्वधर्मसमभाव, ऋणानुबंधातून समाजात एकोप्याचा सकारात्मक संदेश आज पालघर मध्ये देण्यात आला.
हेही वाचा- अवैध्य गुटखा वाहतूकीवर कासार पोलिसांची धाड, 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त