पालघर - जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मागील २ वर्षांपासून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. अशात कोरोना आणि पावसाळा यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पालघरवासीयांनी मदतीसाठी शासनाकडे याचना करत आहेत.
डहाणू तलासरी तालुक्यात २३ ऑगस्ट रोजी दिवसभर अनेक गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे ९ भूकंपाचे धक्के बसले. यामध्ये सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी बसलेला धक्का २.८ रिस्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद झाली. तर, सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी बसलेला धक्का २.३ रिस्टर स्केल क्षमतेचा होता. अशा घटना वारंवार होत आहेत. त्यातच कोरोना आणि पावसाळा असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांची आहे.
शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात; तसेच भूकंप विरोधी घरे बांधून द्यावीत आणि आम्हाला शासनाने भयमुक्त करावे, अशी मागणी ते करत आहेत. पावसाळा सुरू असल्याने, तडा गेलेल्या घरे कधी कोसळतील याचा नेम नसल्याने, पावसापासून बचावासाठी ताडपत्री मिळावी, तंबू उभारावीत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
आजघडीला पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. सरकार भूकंपाबाबत जनजागृती करत आहे, प्रशिक्षण देत आहेत आणि काही प्रमाणात मदतही करत आहे. पण अजूनही येथील नागरिकांमध्ये भीती मात्र कायम आहे.