पालघर - जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी आहे. तर भूकंपाचे केंद्रबिंदू गंजाड आणि धुंदलवाडी दरम्यान आठ किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डहाणू, तलासरी, धुंदलवाडी, आंबोली, धानिवरी, कासा, उर्से, दपचारी, बोर्डी आणि घोलवड तसेच आसपासच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात नोव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या महिनाभरापासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच आतापर्यंत अनेक घरांना तडे गेले असल्याने घरांचे नुकसान देखील झाले आहे.