पालघर - जगभरात दहशत पसरवणारा कोरोना विषाणू आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे फिलिपिन्स येथून 20 कर्मचाऱ्यांसह मालवाहू जहाज शनिवारी दाखल होणार आहे. कोरोना विषाणूबाबतची खबरदारी म्हणून राज्य शासनाच्या सूचनेचेनुसार जहाजावरील 20 कर्मचाऱ्यांचे आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना जमिनीवर न येऊ देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - 'कोका-कोला'ने 23 वर्षे माझी जमीन वापरली... न्यायासाठी शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
डहाणू येथे अदानी कंपनीचे थर्मल पॉवर स्टेशन (एडीटीपीएस) असून येथे कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. यासाठी लागणारा कच्चामाल परदेशातून आयात केला जातो. यामुळे, जगभरातून येणारी जहाजे डहाणूच्या समुद्रात उभी असतात. येत्या शनिवारी परदेशी मालवाहू जहाज डहाणू येथे दाखल होणार आहे. या जहाजावर फिलिपिन्स देशातील 20 कर्मचारी असून, 16 जानेवारीला हे जहाज चीनच्या समुद्रहद्दीतून रवाना झाले व त्यानंतर सिंगापूरहून शनिवारी डहाणूच्या समुद्रात ते दाखल होणार आहे. मात्र, जगभरासह भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारी म्हणून, सिंगापूरहून दाखल होणाऱ्या या मालवाहू जहाजावरील 20 कर्मचाऱ्यांची आरोग्य अधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी तेथे जाऊन संपूर्ण तपासणी व पाहणी करणार आहेत. या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना जमिनीवर उतरू न देण्याच्या सूचना सर्व बंदर अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेनाला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा
जहाजाचे कॅप्टन व प्रशासन यांच्यात सतत संपर्क सुरू असून,जहाजावरील कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून न आल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासन व जिल्हा प्रशासनामार्फत ही प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात येणार आहे.