पालघर - जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २५ कोटी ५८ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली. त्यापैकी ७ कोटी ५४ लाख रुपये इतका अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्यासंबंधीचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसाळ यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे नुकसान
अतिवृष्टी व पुरामुळे पालघर जिल्ह्यात ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे २५ हजार ५८० हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाईसाठी सुमारे १७ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. राज्य शासनाने पूर्वीच्या रकमेत ३२०० रुपये प्रति हेक्टरने वाढ करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याच पद्धतीने फळपिकांसाठी यापूर्वी केलेल्या १८ हजार रुपये प्रतिहेक्टर इतक्या मदतीच्या तरतुदीमध्ये ७ हजार रुपये प्रतिहेक्टर वाढ करून २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्याचे शासनाने ९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयात उल्लेख केला आहे.
त्यानुसार पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ कोटी ५८ लाख रुपयांहून अधिक मदत मिळणार असून त्यापैकी ७ कोटी ५४ लाख रुपयांचा पहिला हप्ता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबतचे आदेश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.