विरार (पालघर) - विरार पाश्चिमेतील भागातून जाणाऱ्या रस्त्याच्या अर्नाळा समुद्र किनारा व अर्नाळा किल्ला या पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग पर्यटकांना कळावा यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. परंतु लावण्यात आलेले दिशादर्शक फलकावर चुकीच्या पद्धतीने माहिती दर्शविली असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अर्नाळा समुद्र किनारा व अर्नाळा किल्ला येथील परिसर निसर्गसौंदर्य संपन्न आहे. त्यामुळे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक अर्नाळा चौपाटी व अर्नाळा किल्ला परिसरात पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यासाठी विरार पश्चिमेतील भागातून मुख्य रस्ता गेला आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना चौपाटी व किल्ला परिसर कोणत्या दिशेला आहे. किती अंतरावर आहे हे सूचित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावले आहेत. परंतू या फलकावर लिहिलेली माहिती ही चुकीच्या पद्धतीने लिहिली असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या पद्धतीने लावलेल्या नामफलकांमुळे प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.
पर्यटन मंडळाच्या चुकीच्या फलकाने पर्यटक संभ्रमात
विरार पाश्चिमेतून प्रवास करताना सर्वात प्रथम अर्नाळा चौपाटी परिसर लागतो. व त्यानंतर चौपाटी वर पोहचून बोटीने अर्नाळा किल्ला परिसरात जावे लागते. असे असतानाही पर्यटन मंडळाच्या फलकावर मात्र आधी अर्नाळा किल्ला व नंतर अर्नाळा चौपाटी असा उल्लेख करण्यात आला आहे. असे फलक चार ते पाच ठिकाणी लावण्यात आले. तर किलोमीटरच्या अंतरातही बरीच तफावत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. फलक लावताना पर्यटन मंडळाने संबंधित भागाची पूर्ण माहिती न घेताच असे फलक लावले का असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासाठी पर्यटकांना दिशा दाखविणारे दिशादर्शक नामफलकांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चुकीचे फलक बदलण्याची स्थानिकांची मागणी
महाराष्ट्र पर्यटन मंडळाने लावलेले चुकीचे नामफलक हे अजूनही बदलले नाहीत. यामुळे अर्नाळा चौपाटी व अर्नाळा याभागात येणाऱ्या पर्यटकांना चुकीची माहिती दर्शवली जात आहे. यासाठी हे नामफलक दुरुस्त करून योग्य ती माहिती फलकांवर लिहावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक निनाद पाटील यांनी केली आहे.