पालघर - हवालदार सखाराम भोये आत्महत्या प्रकरणी गोविंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सादोष मनुष्यवध व अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून केली आहे. हवालदार सखाराम भोये यांनी बुधवारी तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या दालनात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
कारवाईची मागणी
भोये आत्महत्या प्रकरणी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सादोष मनुष्य वधाचा गुन्हा व अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे.
अमानुष वागणूक?
भोये यांनी सूर्यवंशी यांच्या सततच्या अमानुष वागणुकीला व जातीवाचक शिवीगाळ याला कंटाळून पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बुधवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवध व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर प्रकाराची सखोल चौकशी करून मृत भोये यांना न्याय द्यावा, असे भुसारा यांनी देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सखाराम भोये (वय 42) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हवालदार पदावर कार्यरत होते. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनेक प्रश्न
या प्रकाराबाबत संपूर्ण पोलीस ठाणे अनभिज्ञ होते. जेव्हा सकाळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात महिला सफाई कर्मचारी साफसफाई करण्यास गेली, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. आत्महत्येच नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसेल तरी पोलीस ठाण्यातच केलेल्या आत्महत्येने ते मानसिक तणावात होते का? किंवा वरिष्ठांच्या जाचास कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.