पालघर - विरार नजिक राजोडी येथील समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृत डाॅल्फीन वाहून किनाऱ्यावर आला. या मृत डाॅल्फीनचा पंचनामा केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून किनाऱ्यावर त्याला पुरण्यात आले. गेल्या काही वर्षांत अनेक डाॅल्फीन मासे व दुर्मीळ प्रजातीतील ऑलिव्ह रिडले कासव मृत व जखमी अवस्थेत वसई-विरारमधील समुद्रकिनारी सापडत असल्यामुळे ही चिंतेची बाब ठरली आहे.
हेही वाचा - वाढवण बंदर सर्वेक्षणाला स्थगिती, ५ सदस्यांची समिती स्थापन करण्याचे लवादाचे आदेश
साधारण 250 किलो वजन
विरार पश्चिम राजोडी हा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी आलेल्या नागरिकांना हा मृत डाॅल्फीन कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सात फूट लांब असलेल्या या डाॅल्फीनचा मृत्यू कोणत्यातरी अवजड वस्तूला धडकल्याने किंवा मोठ्या मच्छिमारी बोटीच्या धडकेने झाल्याचा अंदाज त्याच्या डोक्यावरील जखमेवरून वर्तवण्यात येत आहे. साधारण 250 किलो वजनाचा हा मृत डाॅल्फीन आहे.
जलचर जखमी किंवा मृतावस्थेत सापडण्याच्या घटनेत वाढ
गेल्या काही वर्षांत डाॅल्फीन व दुर्मीळ जातीचे कासव मृत किंवा जखमी अवस्थेत सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सागरी जिवांमध्ये डॉल्फीन व दुर्मीळ प्रजातीचा कासव ऑलिव्ह रिडरेंचा समावेश आहे. आतापर्यंत ४० पेक्षाही जास्त डॉल्फीन मृत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत डहाणू ते वसई समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीचे जखमी समुद्री कासव सापडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. डहाणू येथील 'वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन' या वन्य व समुद्री जीवरक्षक संस्थेत अशा जखमी जलचरांवर उपचार केले जातात.
हेही वाचा - पालघर : नालासोपाऱ्यात आंतरराज्यीय 'घोडासहान' टोळीला अटक