पालघर - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे पश्चिम किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा धोका जिल्ह्यातील किनारपट्टीलगत असलेल्या 22 गावांना असून काल (मंगळवार) रात्रीपासूनच जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागात पावसाची रिपरिप सुरू झाली असून समुद्राने देखील रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघरमध्ये एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालघरमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी पालघर तर दुसरी तुकडी डहाणू तालुक्यात तैनात आहे. इशारा म्हणून मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे तसेच कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पक्क्या घरात स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच किनारपट्टीलगत कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे शाळा, निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - निसर्ग वादळ: वसई तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन सतर्क; एसडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ; 21 हजार नागरिकांना वादळाचा 'तडाखा' बसण्याची शक्यता, जिल्हाधिकारी म्हणाले. . . . .