पालघर - जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनवर स्थानिक जनतेच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांबरोबरच स्थानिकांना रोजगार आणि डहाणू परिसरातील 15 किलोमीटर अंतरावरील नागरिकांना वीज पुरवठा मोफत करावा ही मागणी करण्यात आली.
हेही वाचा - आदिवासी भागातील शाळा सुरू करण्यासाठी मोर्चा
आमदार निकोले म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकल्प तयार करण्यात आला त्यावेळी स्थानिक जनतेच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, आज २७ वर्षे उलटून देखील मागण्यांची पूर्तता झालेली नाही. येथील व्यवस्थापन झोपलेल्या अवस्थेत असून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांना खडबडून जागे करण्याच्या अनुषंगाने हे पाऊल आम्हाला जनतेच्या व कामगारांच्या वतीने उचलावे लागत आहे. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनता रस्तावर उतरली. या अदानी मॅनेजमेंटचे करायचे काय ? खालती डोके, वरती पाय, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांनी केल्या 'या' मागण्या
कंत्राटी कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य करणे, स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, स्थानिक शेतकरी-बागायतदारांना अदानीच्या प्रदूषणापासून मुक्त करणे, डहाणूतील १५ कि.मी परिसरातील लोकांना मोफत वीज देणे आदी मागण्या करण्यात आल्या.
तसेच, अदानी मधील कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्हाला सकारात्मक न्याय मिळाला नाही, तर आम्ही कामगार आयुक्तांकडे जाऊ, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला. या मोर्चामध्ये कैनाड विभाग सेक्रेटरी चंद्रकांत गोरखाना, धनेश अक्रे आदी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: पालघरच्या किनारपट्टीवर देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन