पालघर(नालासोपारा) - तुळींज पोलीस ठाण्यात इस्टेट एजंटचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा प्रकार तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना भोवले आहे. वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पाटील यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
तुळींज, नालासोपारा पोलीस ठाण्यात सचिन गाला याच्या विरोधात एकही गुन्हा नाही. मात्र, इतर ठिकाणी गुन्हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांनी इस्टेट एजंड सचिन गाला याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याची तपास सुरू केला आहे. याबाबत पोलिसांनी ऑनकॅमेरा बोलण्यास नकार दिला आहे.
हॉटेल आणि इस्टेट एजंट असणारा सचिन गाला याचा वाढदिवस होऊन गेला होता. तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील हे कोरोनाशी झुंज देवून रुजू झाले होते. त्याच दिवशी सचिन याने पोलीस ठाण्यात केक आणून कापला. याचा व्हिडिओ देखील त्यानेच व्हायरल केला. त्यानंतर वसई-विरारचे आयुक्त सदानंद दाते यांनी पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, सचिन गाला याने त्याच्या नावावर साधी एनसीसुद्धा नसल्याचे सांगितले आहे. चौकशी प्रमुख सहायक पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला आहे. दोन दिवसात चौकशीचा अहवाल येईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.