पालघर - नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशिन पत्रात उमेदवारांची व सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळलेले होते. मात्र फेटाळलेले अर्ज स्वीकारण्याचे आदेश पालघर न्यायालयाने आज दिले. त्यामुळे अपात्र उमेदवारांचा नगर परिषद निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक ७-ब, ९-ब व १२- ब या प्रभागातील उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या बाजूने बिनविरोध निवडून आल्याचा आनंद लुटलेल्या प्रभाग क्रमांक ७-ब मधील भाजप-सेना उमेदवार अलका राजपूत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदावर या निर्णयाने विरजण पडले आहे.
भाजपच्या अलका राजपूत यांची आता राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आरती हिमालय संखे यांच्याशी लढत होणार आहे. ९-ब मध्ये तिरंगी ऐवजी चौरंगी लढत अपेक्षित असून प्रभागात शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अतुल पाठक यांना काँग्रेस-आघाडीच्या वनिता प्रजापतींच्या बरोबरीने शिवसेना बंडखोर उमेदवार प्रथमेश पिंपळे यांचा सामना करावा लागणार आहे. प्रथमेश पिंपळे हे विद्यमान नगराध्यक्ष व माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांचे चिरंजीव असल्यामुळे ही लढत खूपच तुल्यबळ ठरणार आहे. तर प्रभाग क्रमांक १२-ब मध्ये मनसेचे सुनील राऊत हेही रिंगणात उतरले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पालघर नगरपरिषदेच्या छाननी दरम्यान सूचक तसेच उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज फेटाळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आरती हिमालय संखे, प्रथमेश पिंपळे व सुनील राऊत या तिघांनी पालघर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. उमेदवारी अर्ज कोणतीही त्रुटी न ठेवता सादर करणे ही उमेदवारांची जबाबदारी असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत हे अर्ज फेटाळताना करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आशा प्रकारच्या त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्या दुरुस्त करुन घेणे आवश्यक असल्याची उमेदवारांनी भूमिका घेतली होती. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून आलेले अर्ज स्वीकारताना असे अर्ज तपासून घेऊन नंतरच स्वीकारावे यासाठी प्रभाग निहाय दोन अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली होती.
अधिकारी त्यांच्याकडील चेकलिस्टनुसार अर्ज तपासून घेऊन व काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करुन घेऊन नंतरच पुढे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवत होते. त्यामुळे फेटाळल्या गेलेल्या ह्या उमेदवारी अर्जाच्या बाबतीत ही निवडणूक यंत्रणेने त्रुटींची पूर्तता करुन घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता गंभीर स्वरुपाच्या नसलेल्या त्रुटीचे कारण दाखविल्याचा दावा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांनी न्यायालयासमोर केला. अपात्र ठरलेल्या या तीन उमेदवारांचा दावा युक्तिवादानंतर न्यायालयाने मान्य केल्याने या तिन्ही उमेदवारांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.