पालघर - शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आज घोषित केलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पालघरमधील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे त्वरित रद्द करावेत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने केली असून या आंदोलनात पालघर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसले असून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करीत आहेत. कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले असून या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. पालघर येथे काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.