पालघर - शासन कुपोषण मुक्तीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करत असुन कुपोषण कमी करण्यासाठी बालकांना आहार तक्त्यानुसार सकस आहार उपलब्ध करून द्यावा असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. ते जव्हार येथील वावर वांगणी या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी दरम्यान बोलत होते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार हे अतिदुर्गम आदिवासीबहुल भाग आहे. या भागात 1992-93 दरम्यानच्या तत्कालीन परिस्थितीत कुपोषणाने लहान मुलांच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यासाठी आणि समस्यांचा निपटारा होण्यासाठी जव्हार भागात अपर जिल्हाधिकारी मुख्यालय सुरू करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वावर वांगणी येथे भेट देऊन इथल्या गाव परिसरातील समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर आरोग्य पथकालाही भेट दिली.
जव्हार तालुक्यातील वांगणी-वावर या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी भेट दिली. यावेळी, त्यांच्यासोबत आमदार सुनील भुसारा, तहसीलदार संतोष शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण पाटिल आदी इतर उपस्थित होते. पावसाळा सुरू झाला असून वांगणी हे दुर्गम पर्जन्यपूरक भाग असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार, सर्पदंश, बालकाचे आजार गरोदरमाता यांना होणारा संसंर्ग तसेच वृद्धांचे आजार बळावण्याची शक्यता असते. यामुळे, आरोग्य केंद्राने औषधांचा मुबलक साठा ठेवावा तसेच ज्या गरोदरमाता आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊ शकत नाहीत. त्यांना घरपोच आरोग्य सेवा द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.