पालघर - जिल्ह्यातील जव्हार आदिवासी भागात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज दौरा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कुपोषण, पाणी टंचाई, रोजगार आणि आरोग्य या विषयावर मुख्यमंत्री काय बोलणार कोणती पाऊले उचलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरे आज शहरातील आरोग्य सुविधा आणि विकास कामांची पाहणी करून आढावा घेणार आहेत.
जव्हार तालुक्यातील वावर वांगनीच्या भुकबळी आणि बालमृत्यूच्या प्रकरणामुळे पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील हा भाग प्रकाशझोतात आला. त्यांनतर इथल्या आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले.
जिल्हा विभाजनानंतरही समस्यां सोडविण्यासाठी संघर्ष कायम-
जुन्या ठाणे जिल्ह्याचे 6 वर्षापूर्वी विभाजन झाले आणि पालघर जिल्हा हा राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हा नवा ३६ वा जिल्हा म्हणून उदयास आला. हा जिल्हा अस्तित्त्वात येत असताना या जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असावे, यावरही बरेच विचारांचे मंथन झाले. आदिवासी जिल्हा म्हणून होत असताना पालघर जिल्ह्याचे मुख्यालय हे जव्हार होईल, अशी अपेक्षा इथल्या जनतेची होती. अखेर पालघर येथे सागरी किनारी या जिल्ह्याचे मुख्यालय झाले. मात्र, आदिवासी भाग असलेल्या जव्हार येथील नागरिकांच्या समस्याकडे नव्या जिल्ह्यातही दुर्लक्षच होऊ लागले.
इथल्या आदिवासी समाजाला पाणीटंचाई आणि रोजगाराची चिंता कायम ...
पाणी टंचाईची समस्या दुर व्हावी म्हणून आदिवासी जनता टाहो फोडत असते, बेरोजगारने पिचलेला इथला आदिवासी समाज रोजगारासाठी बाहेर स्थलांतर करतोय. तर कुपोषणाची समस्याही अधून मधुन डोके वर काढत आहे. कुपोषण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, इथला बेरोजगारीचा, आरोग्याचा आणि पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जनता अद्यापही झगडत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा कसा असेल-
या नियोजित दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून हेलिकॉप्टरने सकाळी 9.30च्या दरम्यान भारती विद्यापीठ येथील हेलीपॅडवर आगमन होईल. तेथून पुढे ते शासकीय विश्राम गृहात दाखल होतील. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यलय येथे बैठकीचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे.
या बैठकीनंतर जव्हार शहरातील कॉटेज हॉस्पिटल येथील नवजात आजारी बालके निरिक्षण कक्ष पाहणी व पोषण पुनर्वसन केंद्राची पाहणी करतील. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथील बालउपचार केंद्राची पाहणी खरवंद येथील अंगणवाडीची पहाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ढापरपाडा गावातील स्थानिक आदिवासी पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलेल्या पर्यटनस्थळास भेट देतील. पुढे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी करून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील.