विरार : निसर्गसंपन्न वसईंचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. वसईला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तिथली खाद्यसंस्कृती हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. वसईच्या पानवेली आणि सुकेळी जगभरात प्रसिद्ध होत्या. शहरीकरणाच्या रेट्यात ही शेती मागे पडली तरी भविष्यातील पिढीला ही खाद्यसंस्कृती माहीत असावी, यासाठी वसई-विरारकरांनी ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. आज वसईच्या सुकेळी भेटीने मी मंत्रमुग्ध झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईची खाद्यसंस्कृती आणि तिथल्या सुकेळींचा गोडवा सांगितला.
सुकेळींचे कौतूक : 9 फेब्रुवारी रोजी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी तेंडोलकर यांनी वसईची सुप्रसिद्ध सुकेळी मुख्यमंत्र्यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी वसई आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीची माहिती दिली. केळी सुकवून सुकेळी बनवल्या जातात.
वसईची केळीही जगप्रसिद्ध : देवगडचा आंबा, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत, तशी वसईची केळीही जगप्रसिद्ध आहेत. ही केळी अत्यंत निगुतीने पिकवावी लागतात. आंबटगोड चवीची, सोनेरी रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख आहे. दिवाळीनंतरच्या चार-पाच महिन्यांत विशेषकरून ही सुकेळी मिळतात. सुकेळ्यांचे उत्पादन केवळ शेतकरीच नव्हे, तर वसईतील बहुतांश घरांत घेतले जाते.
ऐतिहासिक खाद्यप्रकार जपायला हवा : या सुकेळींचे मार्केटिंग व्हावे, हा ऐतिहासिक खाद्यप्रकार जपला जावा, ही परंपरा कायम राहावी, वसईच्या सुकेळींना पुन्हा एकदा लौकिक प्राप्त व्हावा, या अभिनव संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांना आम्ही ही भेट दिली दिली, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. दरम्यान, एरव्ही वाढदिवसाला पुष्पगुच्छ किंवा महागडी भेट देऊन शुभेच्छा दिल्या जातात. पण हा अमूल्य ठेवा भेट म्हणून दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांचे तोंडभरून कौतूक केले. या भेटी वेळी उपतालुका प्रमुख अतूल पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
हेही वाचा : Sanjay Raut Letter To Fadnavis: महाराष्ट्रात काय सुरू आहे? राऊतांचे फडणवीसांना पत्र