पालघर - प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणजेच नाताळ सणाच्या स्वागतासाठी वसईत सर्वच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री मिस्सा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य धर्मगुरूंकडून दररोज चर्चमध्ये सेवा करण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव करण्यात आला.
विरार पश्चिम येथील नानभाट चर्चमध्ये नाताळ सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी चर्च व परिसरात मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे वसईतील जवळपास 32 चर्चमध्ये मोठ्या उत्साहात नाताळ सणाचे स्वागत करण्यासाठी ख्रिस्ती बांधव एकत्र आले होते. सर्व चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना, प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव आदी कार्यक्रम पार पडले.