पालघर - तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील चिक्कू उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना बसला आहे. अनेक वर्षापासून लागवड करण्यात आलेली चिक्कूची झाडे या वादळामुळे उन्मळून पडली असून झाडावर तयार झालेले फळ जमीनवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी, बागायतदार यांच्याकडून केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील चिक्कू देशभर प्रसिद्ध असून सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर चिक्कूची लागवड केली जाते. शेकडो टन चिक्कूच्या निर्यातीतून लाखोंचा व्यावहार दरदिवशी केला जातो. मात्र कोरोनामुळे आधीच चिक्कू बागायतदारांचे बाजारपेठ नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच येथील बागायदार मेटाकुटीला आला आहे. त्यात आता तोक्ते चक्रीवादळ अनेक झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर झाडावरील चिक्कू देखील जमिनीवर गळून पडली आहेत. झाडावर आलेला नवीन चिक्कूचा फुलोरा यांचे देखील नुकसान झाले आहे. चिक्कू पिकाचा पुढचा बहर येण्यास ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिना उजाडेल असे चिक्कू उत्पादकांचे म्हणणे आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे येथील चिक्कू बागायदाराचे कंबरडे मोडले आहे.
दौरे झाले नुकसानभरपाई कधी?
चक्रीवादळानंतर मंत्री, विरोधी पक्षातील नेते, खासदार, आमदार नेत्यांनीही पाहणी दौरे केले. पंचनामे करून नुकसानभरपाई लवकरच मिळेल, अशी आश्वासनेही दिली. मात्र त्याची अंमलबजावणी कधी होईल, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी करित आहेत.